आराधनाची जाहिरात आली तेंव्हा खरं तर आराकू व्हॅली हे नावच पहिल्यांदा ऐकलं. त्या भागाविषयी विषयी काहीच माहीत नव्हतं. परंतु ‘नेहमीचे यशस्वी कलाकार’ असल्यामुळे आम्ही बुकिंग केलं. करोना काळानंतर, पहिल्यांदाच भटकायला बाहेर पडणार होतो त्यामुळेही एक्साइटमेंट होती.
विशाखापट्टण
आंध्र प्रदेश मधलं दोन नंबरचं मोठं शहर आहे. उत्तम नैसर्गिक बंदर (Port), सुंदर ४५ किलोमीटर पसरलेला एकसंध समुद्र किनारा, नेव्हीचं पूर्व भागातलं मुख्यालय ‘ईस्टर्न नेव्हल कमांड’, इथे असल्यामुळे, शहरावर सैनिकी शिस्तबद्धपणा आणि स्वच्छता जाणवते.
जवळ जवळ १३ सुंदर बीच आहेत. साईट सीइंगसाठी बाहेर पडलो की रस्त्याच्या एका बाजूला समुद्राच्या खळाळणाऱ्या लाटा नेहमीच दिसतात. मोठ्या बोटी येण्य-जाण्यासाठी आवश्यक असलेला खोल समुद्र किनाऱ्यांपासून फार लांब नसल्यामुळे समुद्र शांत वाटतो. आम्ही भिमली, याराडा, आणि आर के, असे तीन बीच पाहिले. विशाखापट्टणचं हॉटेल समुद्रकिनाऱ्यापासून फार लांब नव्हतं. त्यामुळे आमच्यातले उत्साही पर्यटक रोज सकाळी ब्रेकफास्टच्या आधीच किनाऱ्यावर जॉगिंग करून येत असत.
म्युझियम
या टूरचा एक हायलाइट आहे अनेक प्रकारची अफलातून म्युझियम
१. पाणबुडी (Submarine) म्युझियम
पाणबुडी विषयी आपण ऐकलेल असत. सिनेमात पाहिलेली असते. (गाझी अटॅक) पण १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेली ‘आय एन एस कुरसुरा’ ही सबमरीन इथे किनाऱ्यावर ठेवली आहे. ही आपल्याला आतून पाहाता येते. ७०० मीटर लांबीच्या आणि जेमतेम १२-१५ फुट डायमीटरच्या ह्या पाइप सदृश सबमरीनमधे ७२ नौसैनिक कसे रहातात, कसे वावरतात, रेडियो वेव्ह्च्या साह्याने शत्रूच्या बोटी, सबमरीनचा वेध कसा घेतात, टोरपेडोच्या साहयाने त्यांचा विध्वंस कसा करतात, हे पाहून आम्ही अचंबित झालो. शाळेत जाणाऱ्या मुलांना हे म्युझियम दाखवलेच पाहिजे.
२. TU 142 Aircraft Museum
रशियन बनावटीचे खूप जुने लढाऊ विमान आपल्याला आत जाऊन पहाता येते. त्याआधी त्या विमानाचे डिझाईन बनवणाऱ्या तंत्रज्ञाची माहिती आणि अनेक छायाचित्रे पहाता येतात. प्रचंड आकाराची क्षेपणास्त्रे लक्ष्याकडे पाठवणारी यंत्रणा पाहून आश्चर्य वाटते.
३. विशाखा म्युझियम / आदिवासी म्युझियम
इथे ह्या भागाचा इतिहास आणि परंपरांची माहिती, चित्रे, पुतळे, आणि पोस्टर वाचून मिळते. जुन्याकाळातील जीवनपद्धती आपल्याला सहज समजावी अश्या प्रकारे इथे देखावे तयार केले आहेत.
४. मंदिरे
नरसिंह मंदिर, बालाजी मंदिर, कैलासगिरी. नरसिंह मंदिर फारच पुरातन आहे. परशुरामांनी ह्या मंदिराची स्थापना केली असे मानले जाते. बालाजी मंदिर, सगळ्या बालाजी मंदिरांसारखे भव्य आणि स्वच्छ आहे.
कैलासगिरी ला टेकडीवर शंकर पार्वतीच्या भव्य आणि शुभ्र मूर्ती आहेत. इथून आजूबाजूचा परिसर छान दिसतो. टेकडीभोवती फिरणारी छोटी ट्रेन मात्र काही आवडली नाही. ट्रेन सुटताना आईस्क्रीम दिलं त्या ऐवजी परत आल्यावर द्यावं.
५. अराकू व्हॅली
समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळच इतकं छान दाट जंगल असेल असं वाटत नाही. परिसर विद्रूप करणाऱ्या विकासाची पावलं अजून इथे पडली नाहीत. आदिवासी विस्तार असल्यामुळे निसर्ग शोभा आहे, कॉफीच्या मळ्यांनी हिरवेगार केलेले डोंगर आहेत. मधमाशी पालन केंद्र छान होतं. खूप वर्षांनी झाडाच्या चिंचा तोडून खाल्ल्या. आदिवासीची परंपरा दाखवणारं म्युझियम, चॉकलेट फॅक्टरी पाहायला मजा आली.
रात्री जेवण झाल्यावर स्थानिक आदिवासी नृत्याकलाकार आले होते. साध्या ठेक्यावर त्या स्त्रियांनी आदिवासी पारंपारीक नृत्याचे शिस्तबद्ध प्रकार छान दाखवले. आमच्या ग्रुप मधल्या उत्साही महिलांनी त्यांच्याबरोबर नाचून घेतले.
६. बोरा गुंफा
अराकूहुन विशाखापट्टणला परत येताना अफलातून बोरा गुंफा पाहिल्या. ह्या गुहांचे वर्णन करणे कठीण आहे. डोंगराच्या पोटात नैसर्गिक प्रक्रियेने अश्या प्रचंड गुंफा तयार झाल्या आहेत. खाली-वर उतरावे-चढावे लागते पण ते श्रम सार्थकी लागतात. ह्या गुहांचा शोध कसं लागला हे त्या स्थानिक गाईड कडून ऐकायलाच मजा येते.
७. डॉल्फिन नोज
आर्मीच्या ताब्यात असलेला हा भाग आहे. इथे एक दीपगृह (Light house) आहे. दिवंगत श्री लालबहादूर शास्त्री केंद्रीय मंत्री असताना त्यांनी १९५७ साली ह्या दीपगृहाचे उद्घाटन केले.
८. टेनेटि पार्क
विशाखापट्टणच्या विस्तीर्ण किनारपट्टीचे दर्शन ह्या ठिकाणाहून होते. फोटो साठी उत्तम जागा आहे.
९. बांगला देशची बोट
एका वादळात बांगला देशची एक बोट वहात येऊन इथे किनाऱ्याला लागली. बोटीवरचे लोक परत गेले पण बोट तशीच बीच वर बेवारस पडून आहे. (आता कापून भंगार विकण्याचे काम सुरू आहे.)
१०. चापराई धबधबा पॅगोडा गार्डन
इथे नदीच्या मार्गात उंचसखल धोंड्यांमुळे छोटे छोटे धबधबे तयार झाले आहेत. गार पाण्यात मस्ती करून फोटो काढण्यासाठी छान जागा आहे.
११. थोतला कोंडा बौद्ध वसाहत
एका टेकडीच्या माथ्यावर विस्तीर्ण पठारावर जुन्या बौद्ध वसाहतीच्या खुणा दाखवणारे अवशेष पाहिले. मुख्य प्रार्थनेसाठीची जागा, बौद्ध भिक्षूसाठी राहण्याच्या जागा, पाणी साठवण्याची व्यवस्था, ६४ खांबाचं मोठं सभागृह असे अनेक अवशेष पाहायला मिळाले.
एकंदरीत भारतातल्या एका अपरिचित भागांची आणि तिथल्या इतिहास भूगोलाची माहिती मिळाली.
आराधना बरोबर आणखी एक छान ट्रीप झाली. 😊